अशी योजना बघितली आहे का ? मुलांना जन्म द्या, लाख रुपयांचा बोनस मिळवा!

Foto
भारत, चीनसारखे देश लोकसंख्या वाढीमुळे त्रस्त असताना इतर काही देशांना कमी लोकसंख्येच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ग्रीस देशाने आता बेबी बोनस योजना जाहीर केली आहे. ग्रीस नागरिकांनी मुलांना जन्म दिल्यास या योजनेतंर्गत त्यांना पैसे मिळणार आहेत.

घटता जन्मदर ही ग्रीस देशाची गंभीर समस्या बनली आहे. ग्रीसमध्ये वेगाने कमी होणारी लोकसंख्या लक्षात घेत सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुलांना जन्म दिल्यानंतर संबंधित पालकांना ग्रीस सरकारकडून २ हजार युरो देण्यात येणार आहे. भारतीय चलनात याची रक्कम सुमारे दीड लाख रुपये आहे. बेबी बोनस या योजनेसाठी ग्रीस सरकारने १४०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार, ग्रीसची लोकसंख्या ही जवळपास एक कोटी असून लोकसंख्येत घट होत आहे. जन्मदर न वाढल्यास येत्या ३० वर्षात या देशातील लोकसंख्या ३३ टक्क्यांपर्यंत कमी होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. ग्रीसमध्ये २०५० पर्यंत ३६ टक्के लोकांचे वय ६५ वर्ष होणार आहे. त्यामुळेच ग्रीस सरकारने भविष्याची गरज म्हणून बेबी बोनस योजना जाहीर केली आहे.

ग्रीसशिवाय इतरही काही देशांमध्ये बेबी बोनस योजना सुरू आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चेक रिपब्लिक, फ्रान्स, इटली, पोलंड आदी देशांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियात बेबी बोनस म्हणून ५ हजार डॉलर म्हणजे जवळपास २ लाख ३८ हजार रुपये देण्यात येतात.